विकिपीडिया म्हणजे काय?
विकिपीडिया हा एकत्रितपणे (crowd-sourcing पद्धतीने), असंख्य लोकानी स्वयंसेवा करून, अनेक वेगवेगळे संदर्भ घेऊन बनवलेला कोश आहे.
याचा अर्थ कुणीही ह्या वेबपेजची बहुतेक पाने/लेख संपादन सुरू करू शकतो. या पद्धतीने तो अत्यंत त्वरेने update होत असतो. परंतु, peer review आणि योग्य संदर्भ यामुळे अचूकतादेखील खूपच जास्त असते.
विकिपीडियामध्ये नवनवीन माहितीची भर घालण्याची लोकांची क्षमता अफाट आहे. तेच त्याचे बलस्थान आहे. उदा. सचिन तेंडुलकरच्या प्रत्येक धावेगणिक विकिपीडिया कदाचित update होत असेल. (खरे तर होतोच) इतर कोषांमध्ये तसे होणार नाही.
विकिपीडियाचे काम ज्या मूलभूत तत्त्वांवर चालते, ते पाच आधारस्तंभ असे:
1. विकिपीडिया एक ऑनलाइन ज्ञानकोश आहे.
2. विकिपीडियाचा दृष्टिकोन निष्पक्षपाती आहे. लेखातील विषयाबद्दल प्रचलित असणारे प्रमुख दृष्टिकोन संतुलित व निष्पक्षपाती पद्धतीने वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न असतो
3. विकिपीडियावरील आशय मुक्त असून कोणीही त्याचे संपादन व वितरण करू शकते. प्रताधिकार कायदे पाळावे व अन्य स्रोतांवरून उचलेगिरी करू नये.
4. विकिपीडिया सदस्यांनी परस्परांशी आदराने व सभ्यतेने वागावे. विकिपीडियावरील अन्य सदस्यांशी मतभेद असले, तरीही आदराने व सौजन्याने व्यवहार करावा. विकिपीडियावरील शिष्टसंकेत पाळा व वैयक्तिक हल्ले करू नये. सहमती साधावी, संपादनयुद्धे टाळावीत.
5. विकिपीडियावर कडक नियम नाहीत. विकिपीडियावरील नियम काळ्या दगडावरील रेषा नव्हेत. विकिपीडियावरील नियमांच्या शब्दश: रचनेपेक्षा, त्यातील मथितार्थ व त्यातून व्यक्त होणारी विकिपीडियाची मूलभूत तत्त्वे अधिक महत्त्वाची मानावीत.
विकिपीडियात एखादा लेख बेजबाबदारपणे लिहिला जाणं किंवा बेजबाबदारपणे संपादिला जाणं आणि तो बराच काळपर्यंत विकीपीडियावर तसाच राहणं अशक्य नाही असा आरोप केला जातो. त्यामधे काही प्रमाणात तथ्य असले तरी ते पूर्णपणे खरे नाही. अनेक वेगवेगळे संदर्भ घेऊन बनवलेला तो कोश आहे. संदर्भ न देता काहीही लिहा असे तिथे चालत नाही. असे लेख जर असतील, तर ते वगळले जातात.
वगळण्याची इतर मुख्य कारणे
प्रताधिकार उल्लंघन घडले असल्यास.
ज्ञानकोशीय दृष्टिकोनातून उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्यास.
विषयाशी संबंध नसलेला जाहीरातबाजीसदृश आशय/मजकूर
स्पॅम (SPAM) आशय/मजकूर असल्यास.
वाचनीय मजकूर न भरता कोरा लेख बनवला असल्यास.
अशा प्रकारची धोरणे आणी निकष नक्कीच पाळले जातात व त्यामुळेच विकिपीडिया अधिकाधिक अचूक होत जातो. प्रताधिकार उल्लंघन हे तर फारच निष्ठेने व काळजीपूर्वक हाताळले जाते.
विकिपीडियाचे फायदे कुणाला?
शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रकल्प(प्रॉजेक्ट) बनवण्याकरिता प्राथमिक माहिती उपलब्ध होते.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च कमी ठेवण्यात मदत होऊ शकते.
शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण सबळ संदर्भानिशी एखादे विवेचन करण्याची सवय होते. विकिपीडियावर लेखन करणार्या विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर शिक्षणात ‘प्रबंध कसे लिहावेत‘ याची पूर्व तयारी होते.
एखाद्या विषयाबद्दल ‘समर्थन‘ करणार्या तसेच ‘विरोध‘ करणार्या मतांशी परिचय होतो, त्या मुळे दृष्टीकोन एकांगी होण्याचे टळते.
टिमवर्कची आणि परस्पर सहकार्याची (collaborative work) तसेच इतरांना प्रोत्साहन देण्याची सवय लागते.
एखादा नवीन विषय आल्यास विकिपीडियातील सोप्या भाषेत चटकन तोंडओळख होते व समजण्यास सोपे जाते.
नवीन शहरात किंवा संस्थेत जाण्यापूर्वी त्या शहरांबद्दल किंवा संस्थेबद्दल समतोल माहिती मिळते.
वेळ सत्कारणी आणि सकारात्मक कामात व्यतीत होतो.
विकिपीडिया वापरणाऱे कोण आहेत?
शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक.
वृत्तसंस्था: लेख, छायाचित्रे इत्यादी कोणत्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध होऊ शकतात. विकिपीडियावर दिलेले संदर्भ सत्यता तपासण्याकरिता वापरता येतात.
लेखक: विकिपीडियावर वाचन केल्यामुळे विवीध विषया बद्दल सहज ज्ञान वाढवून घेता येते. संदर्भ अभ्यासता येतात.
प्रकाशक: बरेचसे चांगले लेख या मुक्त स्रोतातून विना मोबदला घेता येऊ शकतात
वाचनालये: प्रताधिकार रहित जुनी दुर्मीळ पुस्तके विकिपीडियावर जतन करता येतात. वाचन संस्कृतीस बढावा मिळतो
विकिपीडिया नसेल तर काय ?
माहिती आणि संदर्भ सहजतेने उपलब्ध होणार नाहीत.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च वाढणार.
वृत्तसंस्थांना लेख, छायाचित्रे इत्यादी मोबदल्याशिवाय उपलब्ध होऊ शकणार नाहीत.
विवीध विषया बद्दल सहज ज्ञानार्जन करण्याची संधी जाणार.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
This article was published in Maharashtra Times on 23 January 2012.
Even though it is published in my name, it has considerable inputs from Mandar Kulkarni and Mahitgar from Marathi Wikipedia.

